अस्तंबा यात्रा : एक अविस्मरणीय अनुभव


[ चित्र क्र. ०१, अस्तंबा शिखर, पूर्वेकडील,परतीच्या मार्गाने टिपलेले छायाचित्र... ]

यात्रेला जाण्याआधी...
३/१०/२०१८

          आज संध्याकाळी ४ वाजेच्या आसपास सातपुड्याकडे पाहिले तर तो अधिकच जवळ दिसत होता जणू तो आमंत्रण देत असावा त्याच्या कणखर बाहूंवर चालण्यासाठी. उद्या सकाळी निघायचे होते अस्तंबा यात्रेसाठी. म्हणून सर्व तयारी करून घेतली. बॅगपॅक करतांना अंथरूण-पांघरून, शिदोरी, महत्वाचे म्हणजे पाण्याची बॉटल, लिंबू आणि टॉर्च हे घेतलेच पाहिजे.

यात्रेला सुरुवात...
४/१०/२०१८

[ चित्र क्र. ०२, नर्मदानगरहून सातपुड्याकडे जातांना... ]

          अस्तंबा यात्रा ही सातपुड्यातील आदिवासींची दरवर्षीची नियमित यात्रा असते. महाभारतातील एक पात्र ज्याला श्रीकृष्णांच्या श्रापामुळे कपाळावरील धगधगती जखम घेऊन वणवण भटकावे लागले. याच अस्वत्थामांची ही यात्रा. सातपुड्यातील आदिवासींचे श्रध्दास्थान असलेले “अस्तंबा ऋषी यात्रा” ही यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे.

          आज खूपच उत्सुकता होती. मी जिथे राहतो, अक्कलकुवा तालुक्याच्या एका गावात, तिथून सातपुड्याची भली मोठी आणि विशाल रांग नेहमी माझ्यासाठी नवलाचा विषय, सातपुड्याच्या एका तरी शिखरावर जावे असे, माझ्या स्वप्नाच्या यादीतील एक स्वप्न होते आणि आता ते पूर्ण होणार होते. सकाळी ७ च्या सुमारास आम्ही निघालो. अस्तंबा यात्रा करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. अक्कलकुवाहून सोमावल बु|| या गावापर्यंत आम्ही भाड्याने रिक्षा केली. सोमावल बु|| या गावापासून सातपुड्याच्या दिशेने नर्मदानगर नावाच्या गावाकडे पायी निघालो, सोमावल बु|| गावात यात्रेकरुंसाठी जेवणा-पाण्याची सोय गावकरी मोठ्या सेवाभावाने करतात. तिथे थोडेफार जेवून सातपुडा पर्वतरांगेच्या दिशेने चालत निघालो. एक-दोन कि.मी. चालून वाटेत रिक्षा मिळाली आणि नर्मदानगर पर्यंत रिक्षाने निघालो. वाटेत पाळणीकरून जाणारे तसेच नवस बोलणारे भाविक पायी येत होते. वाटेत डफ-ढोलांचा आवाज घुमत असतो. अखेर आम्ही नर्मदानगर पर्यंत पोहोचलो. सोमवल बु|| पासून ५ किमी अंतरावर नर्मदानगर गाव आहे आणि तिथून पाच -सहा शेतमळे पार करून सातपुड्याच्या आणि आपल्या पायांचा मेळ होतो. नर्मदानगर पासून अस्तंबा गाव हे सुमारे ५.५ किमी आहे. येथून पुढे पायीच जावे लागते. वाहने जात नाहीत. पायवाट तुडवीत आम्ही सातपुड्याच्या भयाण जंगलात प्रवेश केला. मागे आणि पुढे नजर जाईल तेथपर्यंत घनदाट जंगल. सोमावल-नर्मदानगर पासून थेट चांदसैली पर्यंत लहान लहान मुले “बाबा पोईसो, बाबा पोईसो” (बाबा पैसे) करत एक दोन रुपये मागत असतात हे २ ते ९ वर्षांपासूनच्या या मुलांच्या (काहींच्या) कपड्यांवरून ते शाळकरी वाटत होते. दिवाळीच्या सुट्टींमुळे ते आसपासच्या गावांतून ते या वाटेवर येत असावे. भाविक त्यांना एक दोन रूपये देत जात होते. आमचेही सुटते पैसे यातच संपले पण काही खंत नाही. (चित्र क्र.०३ पहा.)

[ चित्र क्र. ०३, पैसे मागणारे मुले... ]

[ चित्र क्र. ०४ ]

          आम्ही आता सातपुड्याच्या तिसऱ्या रांगेपर्यंत पोहोचलो. १२ वाजता आम्ही काही छोट्या मंदिरांपर्यंत पोहोचलो होतो. (चित्र क्र. ०४ पहा.) त्या छोट्या मंदिरात मी दर्शन केले. तिथे थोडी विश्रांती केल्यावर पुढे चालू लागलो. १० मिनीट पुढे चालत गेल्यावर एका टेकडीवर एक छोटे मंदिर होते तिथे नवस बोलणारे भाविक नारळ फोडून दर्शन घेऊन पुढे जात असावेत. आमच्या ग्रुप मध्ये तीन जाणकार आणि मी धरून पाच जण हे नवखे होते. जाणकारांनी सांगितले की पुढे भरपूर चालायचे आहे म्हणून आम्ही त्या मंदिरात प्रवेश न करता बाहेरूनच दर्शन करून चालू पडलो.(चित्र क्र. ०५ पहा.)

[ चित्र क्र. ०५, टेकडीच्या सुरुवातीला असलेले मंदिर... ]

           आता नागमोडी पायवाट ही टेकडीपासून तिरकस आणि अधिकच कणखर होत चालली होती. जंगल अधिकच दाट आणि भयानक वाटत होते. टेकडी पार करून जंगलातून पायवाट तुडवीत असतांना  बिनभिंतीचे एक मंदिर होते त्यात कोरीव काम केलेल्या तीन शिळा आकर्षक होत्या, त्या शिळांवर समशेरधारी घोडेस्वार कोरलेले आहेत. सवंगडी पुढे चालतच होते व मी या शिळांचा फोटो क्लिक करून चालू लागलो. (चित्र क्र. ०६ पहा.) शिळांबद्दल अधिक माहिती विचारायची होती पण विचारणे राहून गेले. [माझ्यामते या शिळा आदिवासींच्या राजांच्या म्हणजेच ‛राजा पांठा’ आणि ‛गांडा ठाकूर’ यांच्या असाव्या आणि तिसरी शिळा ही अश्वत्थामा यांची असावी कारण आदिवासी लोककथांमध्ये या दोन्ही राजांनी अश्वत्थामा यांना त्यांचे राज्य म्हणजेच सातपुड्यात राहण्याची संमती दिली.]

[ चित्र क्र. ०६, समशेरधारी घोडेस्वारांच्या शिळा... ]

          जंगल घनदाट जरी असले तरी ढोल-ढफांचा, टाळ-बासरीचा आवाज घुमत असल्याने आणि “अस्तंबा महाराज की जय!” “मोडा देवू (मोठा देव) की जय!” असा जयघोष करत भाविक पुढे चालले होते. वाटेत फक्त पैसे मागणारे नव्हे तर पैसे कमावणारे मुले-मुली देखील मिळाले. (चित्र क्र. ०७ पहा.)

[ चित्र क्र. ०७, आवळे विकणाऱ्या मुली... ]

          जंगलातून जातांना वाटेत लागतो तो मेंडादेव.(?) येथे मेंढाच्या आकाराचे दगडाचे शिल्प येथे पहायला मिळते. (चित्र क्र. ०८ पहा.) यात्रेकरू येथे बांबूच्या पानांची छोटी डहाळी, उदबत्ती दाखवतात, कुंकू-अभिर,शिंदूर लावतात तसेच नारळ चडवितात.

[ चित्र क्र. ०८, मेंडादेव शिल्प ]

[ चित्र क्र. ०९, मेंडादेवाच्या शिल्पासमोर ठेवलेला दगड... ]

          या मेंडदेवाच्या समोर एक गोल दगड ठेवलेला असतो. (चित्र क्र. ०९ पहा.) अशी मान्यता आहे की येथे येणाऱ्या भाविकांने हा दगड उचलून आपण कितीदा येथे यात्रा करणार आहोत हे ठरवायचे असते, समजा तुम्ही ५ वर्षे नियमित यात्रा करण्याचे ठरविले असेल तर पाच वेळा दगड उचलावा. आणि जितक्या वेळा तुम्ही दगड उचलला आहे तितक्या वेळा यात्रा करणे बंधनकारक असते.

[ चित्र क्र. १०, वांदर बयडी कडे जाण्याअगोदर लागणारी टेकडी सर करतांना यात्रेकरी... ]

          सूर्य डोक्यावरून जात असतांना देखील जंगलातून थंड हवेची लहर घामाघूम झालेल्या शरीराला गारवा देत होती. आता एक टेकडी (चित्र क्र. १० पहा.) पार करून वांदर बयडी डोंगराचा पायथा गाठायचा होता.

          ३ वाजेच्या सुमारास आम्ही वांदर बयडी (वानर डोंगर) नावाच्या डोंगराच्या पायथ्याशी होतो. तिथे आम्ही थोडी विश्रांती करून शिदोरी सोडली. जेवणानंतर सातपुड्याच्या कणखर दगडातून फुटणारे थंडगार पाणी मन तृप्त होई पर्यंत प्यालो. येथून न विसरता बॉटल भरून घेणे गरजेचे आहे कारण शिखरापर्यंत फक्त एका अरुंद वाटेने चढावे लागते आणि साहजिकच तिथे पाणी मिळत नाही. या डोंगराच्या शिखरावर “नोकट्यादेव” म्हणजेच पांडव नकुल यांचे तीर्थस्थान आहे.

[ चित्र क्र. ११, वांदर बयडी/नोकट्यादेव डोंगर सर करतांना यात्रेकरी... ]

          नोकट्या म्हणजे चपट्या नाकाचा. (आदिवासींमध्ये नकुलाला नोकट्यादेव हे प्रेमाने म्हटले जाते. जसे आपण आपल्या प्रिय व्यक्तीला एक नाव विशिष्ट नाव देतो.) वांदर बयडी (नोकट्यादेव शिखर) सर करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन चडण्यासारखे आहे. (चित्र क्र.११,१२ व १३ पहा.) पाय घसरला तर साक्षात मुत्यु अशी पायवाट जिथे एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो.

नोकट्यादेव डोंगर सर करणारे यात्रेकरी...

[ चित्र क्र. १२ ]

[ चित्र क्र. १३ ]

          वांदर बयडी सर करत असतांना सातपुड्याचे जितके जीवघेणे रूप पाहायला मिळते तितकेच सौदर्यांने भरलेले रूपही पहायला मिळते. क्षितिजापर्यंत सातपुड्याच्या टेकड्या-डोंगर, आणि आसपास शिखरेच दिसतात. असाच एक डोंगर आहे तो गोगलगायीचा. (चित्र क्र. १४ पहा.) वांदर बयडी चढत असतांना समोर दिसतो तो विशाल गोगायगायीच्या आकाराचा भासमान खडक. तिथे काही माकडेही आम्हांला दिसली.

[ चित्र क्र.१४, विशाल गोगलगाय वर चढत आहे असे भासणारा खडक... ]

[ चित्र क्र. १५, नोकट्यादेव सर करतांना शेवटचा पढाव... ]

          नोकट्यादेव डोंगर सर केल्यावर थकवा तर असतोच, पण तुम्ही चारी दिशेला पाहिले तर प्रकृति मातेचे सौदर्यं पाहताच तो थकवा दूर होतो. थंडगार वाऱ्यामुळे थकवा नाहीसा होतो. नोकट्यादेव शिखरावर पोहोचलो तेव्हा आम्हांला थोडा सपाट भाग दिसला. ढोल-ढफांचा आवाज घुमत होता. तिथे थोडा विसावा घेतला.
[ चित्र क्र. १६, नोकट्यादेव शिखरावरून दिसणारे सातपुड्यातील इतर शिखर... ]

          नोकट्यादेव शिखरावर अस्तंबा(रे) चे काही ग्रामस्थ दुकाने मांडून बसलेले असतात. तिथे नारळ-उदबत्ती,ध्वज,तसेच शेंदूर विक्री करतात. “रोयचो” नावाचे औषधी गवतही विक्री करतात. (चित्र क्र. १७ पहा.) अस्तंबाला गाठणारे प्रत्येक भाविक “रोयचा” घेतातच. अशी श्रद्धा आहे की या रोयचा वनस्पतीची धूप करून आजारी व्यक्ती वा प्राण्याला दिली असता ते लवकर बरे होतात. येथे हनोकट्यादेवाला प्रणाम करून नारळ चढविला आणि आम्ही पुढची वाट धरली.
[ चित्र क्र. १७, नोकट्यादेव शिखरावरील एक रोयचा विक्रेता ]

          सूर्य आता मावळतीला आला. पुढे चालता चालता पाण्याचा खळखळाट कानी येऊ लागला. थोडे पुढे जाऊन पाहिल्यावर डोंगरातून कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा डोळे भरून पहिला. (चित्र क्र. १८ पहा.) थकवा घालवण्यासाठी आम्ही धबधब्याखाली अंघोळीच्या निर्णय घेतला. अतिशय थंड पाण्याच्या स्नानाने संपूर्ण शरीर थकवा मुक्त झाले. आणि वाट धरली ती जुना अस्तंबा म्हणजेच अस्तंबा गावाची.
[ चित्र क्र. १८, थकवा घालविणारा धबधबा... ]


[ चित्र क्र. १९, जुना अस्तंबा गावापासून सुमारे १ कि.मी . अंतरावरून दिसणारे अस्तंबा शिखर ]

          हळूहळू अंधार होत चालला होता. आणि अंधारात विजेरी असल्याने तो भयानक रस्ता आम्ही पार केला. घनदाट जंगल, सर्वत्र अंधार आणि चित्रविचित्र जंगली आवाज असा भयानक रस्ता तुडवीत शेवटी आम्ही ७ - ७:३०च्या आसपास अस्तंबा गाव गाठले. गाव जत्रणे जगबजलेले होते, नुस्ता ढोल-ढफ, टाळ-बासरी, आणि मनसोक्त नाचणारे व जयघोष करणारे भाविक यामुळे असे वाटतच नव्हते की आपण एका अश्या गावात आहोत ज्याच्या चौफेर जंगल आहे. आमच्या जाणकारांनी जे नियमित या यात्रेत यायचे त्यांनी एका गावकऱ्यांचे घर गाठले ते म्हणायचे की आम्ही दरवर्षी यांच्या घरी थांबतो. देवाची कृपा की आम्हांला रात्री झोपण्यासाठी जागा मिळाली नाहीतर इतर भाविक मिळेल त्या जागी झोपी जातात. आम्ही त्या घरात आमच्या बॅग्स ठेवल्या ज्या इतक्या लांबच्या प्रवासात आमच्या पाठीची व्याधीच होत्या. नंतर आम्ही जत्रेत फिरू लागलो, तिथे एक हॉटेलात जेवलो. आणि परत झोपण्याच्या जागी परतलो. थकवा इतका होता की लगेच झोप लागली पाहिजे होती मात्र मला झोपच येईना. कसाबसा डोळा लागला. रात्री १:३० दरम्यान झोप उघडली. काही म्हणाले चलायचे आता पण काही म्हणाले अर्धा तास झोपून घेऊ. ठीक रात्री २ वाजता आम्ही ते घर सोडले आणि शिखराच्या दिशेने निघालो.


[ चित्र. क्र. २०, जुना अस्तंबा गावातून रात्री दिसणारे अस्तंबा शिखर शिखर मार्गावर लावलेले विजेचे सौर दिवे ताऱ्याप्रमाणे भासत होते...]

दुसरा दिवस
४/१०/२०१८
[ चित्र क्र. २१, सातपुड्यातील अस्तंबा ऋषी शिखर...]

          गाव मागे टाकत आम्ही भीमकुंडाच्या दिशेने निघालो. असे म्हटले जाते की, अस्तंबा शिखराच्या पायथ्याशी असलेले, भीमकुंड हे पांडव भीमाने तृष्णा शमविण्यासाठी गदा मारून तयार केले. या तयार झालेल्या जलकुंडाला तेव्हापासून भीमकुंड असे म्हटले गेले. या भीमकुंडातील पाणी रोगमुक्त करणारे असल्याने प्रत्येक भाविक येथे शिखर चढण्यापूर्वी स्नान करतात. असेही म्हटले जाते की पहिल्यांदा जो या तीर्थस्थळाला भेट देतो त्याने विना कपड्याचे येथे स्नान करावे. याच कारणास्तव लोक आपल्या ६-१० वर्षांच्या मुलांना घेऊन येतात.
          रात्रीच्या ३ वाजेच्या सुमारास आम्ही शिखर सर करायला लागलो. अस्तंबा गावापासून सुमारे २.५ किमी उंच हे शिखर आहे. रात्र असल्याने रस्ता दिसत नाही. मात्र या वर्षी विजेच्या खांबांची सोय असल्याने थोडेफार दिसत होते या ठिकाणी विजेरीचा खूप उपयोग होतो. येथील रस्ताही फार कठीण असून दोन्ही बाजुंना खोल दरी असते. चालतांना तोल सांभाळून चालावे लागते. भाविक शिखर चढत असतांना “दौडों टाकजे, खेची लेजे” (दोरखंड टाका आणि वर खेचून घ्या...) अशी घोषणा करत चढतात. आधाराची सोय असल्याने चढाई जरा सोपी होते. रात्र असल्याने पुढची वाट सोडून काहीच दिसत नव्हते आणि याच कारणाने उंचावरची भीती राहत नाही आणि शिखर सहज चढले जाते. आम्ही ठीक ६ वाजता सातपुड्याच्या एका उंच शिखरावर होतो. (चित्र क्र. २१ पहा.)

          सूर्योदय होऊन अस्तंबा ऋषींचे दर्शन आम्हांला झाले. तिथे अस्तंबा ऋषींचे दर्शन घेऊन आम्ही तिथे नारळ चढविला. रोयचा पूजन घेतला आणि आम्ही मनोभावे पूजा करून घेतली. शिखरावर न मावणारी गर्दी असली तरी प्रत्येकाला शिखरावर जागा मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. आम्ही ७:३० वाजेच्या सुमारास तेथून शिखर उतरल्यास सुरुवात केली.
चढणे जितके कठीण आहे तितकेच कठीण उतरणे आहे. उतरतांना कधी पाय घसरणार याची शाश्वती नाही. येथेही जीव मुठीत घेऊन जावे लागते. आम्ही थोडे उतरल्यावर “मामा-भांजा” नावाचे स्थळ गाठले. (चित्र क्र. २२ पहा.) हे स्थळ महाभारतातील दुर्योधन आणि शकुनी यांच्या स्मरणार्थ आहे असे म्हटले जाते. दोन मोठया खडकातून एक माणूस निघेल इतका रस्ता असून एका खडकाला मामा तर एका खडकाला भांजा असे म्हटले जाते. अशी आख्यायिका आहे की, या खंडकांच्या मधून कितीही जाड व्यक्ती असली तरी निघून जाते मात्र मामा-भांजा सोबत असतील तर त्यांना येथून निघता येत नाही. हे एक प्रकारचे देवसत्व आहे असे भाविक म्हणतात. याच खडकाच्या पुढे अश्याच प्रकारचे दोन खडक येतात त्यांना “देरानी-जेठानी” असे म्हटले जाते. देरानी-जेठानी हे स्थळ कुंती आणि गांधारी यांच्या स्मरणार्थ आहे.

[ चित्र क्र. २२, मामा-भांजा ठिकाण... ]

          येथून पुढे आम्ही शिखर उतरू लागलो. उतरतांना तोल सांभाळावा लागतो ज्याचा तोल गेला तो कायमचा गेला. पण मनात पाप नसेल आणि अतूट श्रद्धा असेल तर ते म्हणतात ना “देव तारेल त्याला कोण मारेल...”
          तेथून पुढे वाळिंबा नावाच्या प्रदेशातून लहानमोठ्या टेकड्या पार करून चांदसैली गावापर्यंत जावे लागते. चांदसैलीपर्यंत जाता जाता थकवा तर येईलच पण सातपुड्याचे ते सौदर्याने भरलेले रूप पाहून सारा थकवा दूर होतो. (चित्र क्र.२३ पहा.) अस्तंबा ते चांदसैली हे अंतर सुमारे ६ ते ६.५ किमी आहे. चांदसैली गाव हे तळोदा-अक्राणी रस्त्यावर असल्याने येथून भाड्याने जीप करून २० किमी असलेले तळोदा गाठता येते. चांदसैलीहुन तळोदायापर्यंत येता येता सर्व थकवा दूर होऊन जातो. अश्या प्रकारे आम्ही तळोदा गाठले आणि तळोद्याहून अक्कलकुवा.

[ चित्र क्र. २३, वाळिंबा प्रदेश, चांदसैलीकडे जातांना दिसणारे सौदर्यं... ]


[ चित्र क्र. २४, आमचा प्रवास मार्ग अक्कलकुव्याहून सोमवल बु|| - नर्मदानगर -अस्तंबा - चांदसैली - तळोदा -अक्कलकुवा. (नर्मदानगर ते चांदसैली पायी...) ]

          हा दोन दिवसांचा प्रवास असला तरी मला असे वाटायचे की आपण कित्येक महिन्यांपासून या सातपुड्यात फिरतोय, या दोन दिवसात मला इतके मिळाले आहे की त्याची गणना करणे म्हणजे वेळ वाया घालवणे होईल. खरंच प्रवास कुठलाही असो घराबाहेर पडल्यावर आपल्याला असे काही विशेष मिळते ज्यास माणूस खरेदी नाही करू शकत.

[ चित्र क्र. २५, तीर्थस्थान श्री अस्तंबा ऋषी महाराज धाम, शिखर...]

[ चित्र क्र. २६, अस्तंबा शिखर ते चांदसैली गाव मार्ग, 3D छायाचित्र सौ. Google Earth ]

          आणखी बरेच लिहायचे बाकी आहे जसे श्राप मिळालेल्या अश्वत्थामा यांना आदिवासी पूजनीय का मानतात? असे प्रश्न तुमच्याप्रमाणे माझ्याही मनात आले होते आणि त्यांचे निरसन ही झालंय. ते आपण पुढील भागात पाहू.
धन्यवाद.

© हर्षद उ. वि. वळवी

टिप्पण्या

SM म्हणाले…
Absolutely a master piece!!!! Felt like even I was a part of your group. Such a brave accomplishment and so nicely drafted and shared on blog with apt pictures to help exploring even more. ����������������
Harshad, you are a superstar!!!! ��✨��
Swapnil म्हणाले…
अप्रतिम लिहिले आहे. सह्याद्री तील ट्रेकचे वर्णन करणारे असंख्य ब्लॉग आहेत. सातुपड्याची भ्रमंती घडवणारा तुमचा हा ऐकमेव ब्लॉग वाचायला मिळाला. उत्तम फोटो आणि त्याचे समर्पक वर्णन. मुख्य म्हणजे शेवटी नकाशा दिल्याने ईतरांना हा ट्रेक करताना त्याचा मार्गदर्शक म्हणून उपयोग होईल. पहिलाच प्रयत्नात तुम्ही षटकार मारलात.
पुढचा भाग लवकर लिहा.
हर्षद वळवी म्हणाले…
धन्यवाद, स्वप्नील जी. वाचकांच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी प्रेरणादायी ठरतात.
निनावी म्हणाले…
या वयात एवढं जबरदस्त लिखाण भाऊ ख़रच जेवध कौतक केल तेवढे कम आपले जबरदस्त भावा विचारशैली तर त्याततुन जबरदस्त हर्षल भाऊ पुढील वाटचाली साथी हार्दिक अभिनंदन ख़रच जबरदस्त ब्लॉग लिहलाय...������
हर्षद वळवी म्हणाले…
अरे भाई, इतना भी बडा मत बनाओ, इंसान हूँ इंसान ही रहने दो....
हर्षद वळवी म्हणाले…
धन्यवाद सोमनाथ जोहरी,
खूप खूप धन्यवाद...
Swapnil म्हणाले…
उत्तम. या भागाची वाट बघत होतो. आता अजिबात थांबु नका. लिहीत रहा. त्यासाठी शुभेच्छा.
हर्षद वळवी म्हणाले…
धन्यवाद,
स्वप्निल जी 🤗🙏🙏
Unknown म्हणाले…
एकच नंबर भाऊ. शब्द + फोटो छान जमलय.वाटतच नाही आहे तुझा पहिला लेख आहे अस.एका लेखाबद्दलच्या सर्व अपेक्षा तुझ्या लेखणीकडून पुर्ण होताना दिसतायेत.तुझ्या भावी लिखाणाला हार्दिक शुभेच्छा.
तुझाच - वैभव
विनयशब्द म्हणाले…
खुप छान हर्षद भावा....
अद्भुत सुंदरतेने नटलेली सातपुडा पर्वतरांग आणि त्यापेशाही तु त्या सौदर्यांचे विलशन असे वर्णन केलेला लेख....
लेख वाचतांना अस वाटत होते की, मी पण याञेला निघालो आहे की काय....
तुझा शब्दात ती जादु आहे जी वाचकाला जाणवुन देते की, आपण पण तिथेच आहोत.
तुला भावी लेखना साठी मनापासुन शुभेच्छा.👌👌
हर्षद वळवी म्हणाले…
धन्यवाद भाऊ...❤️🤘🙏
Vilas Patil म्हणाले…
प्रिय हर्षद, ट्रेकिंग चा अनुभव तोही सातपुड्यातला!
अगदी उत्तम प्रकारे चित्राच्यासह शब्दबध्द केला आहे...काही ऐतिहासिक बाबींचा खुलासा छान झाला आहे.
Unknown म्हणाले…
Kharach bhau khup chan as vatat hote kase aata ki janu satpuda dolyasamor aahe
Unknown म्हणाले…
खरचं माला तर हा ब्लॉग वाचन करतांना असे वाटले कि मी पण कुठे तरी हया सातपुडा पर्वतात तुमच्या बरोबर हरवलोय कुठेतरी,
हर्षद ट्रेकिंग चा अनुभव तोही सातपुड्यातला
अगदी उत्तम प्रकारे चित्राच्यासह शब्दबध्द केला आहे...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

Your class friend vijay thakare

लोकप्रिय पोस्ट