अश्वत्थामा ते अस्तंबा

           
            महाभारत या महान काव्याला न जाणणारा व्यक्ती भारतात मिळूच शकत नाही. महाभारत ही एक अशी रचना आहे ज्यात आजही समाजात दिसणारे प्रत्येक पात्र आपल्याला त्या पात्रांशी सुसंगत दिसतात. या महाकाव्यात प्रत्येक पात्रांच्या मागे वेगवेगळी कथा आहे. सत्यवतीपासून ते कुंती,द्रौपदीपर्यंत तसेच शंतनू,भीष्मपासून कौरव पांडव आणि त्यांच्या सहकाऱ्यापर्यंत. सर्व पात्रांमागे कथा असून त्या परिस्थितीनुरूप त्यांचे स्वभाव व त्या स्वभावांमुळेच चांगले व वाईट पात्रांच्या विभागणीत ते पात्र समाविष्ट होतात.

           महाभारतातीलच एक पात्र म्हणजे अश्वत्थामा. द्रोणाचार्य आणि कृपी यांनी हिमालयात तपस्या करून भगवान शिवांना प्रसन्न करून वरदान स्वरूप पुत्रप्राप्तीची कामना केली, आणि भगवान शिवांनी मी स्वतः कृपीच्या पोटी जन्म घेईन असे वरदान दिले. 
           भगवान शिवांच्या आशीर्वाद फलस्वरूप द्रोणाचार्य आणि कृपी यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. जन्मताच अश्वाप्रमाणे खिंकाळल्यामुळे त्या दिव्य बालकाचे नाव अश्वत्थामा असे ठेवण्यात आले.अश्वत्थामाच्या कपाळी एक दिव्य निलमणी जन्मापासूनच होता. या मणीच्या प्रभावाने अश्वत्थामा अभयपदी विराजमान होता. अश्वत्थामाचे बालपण कठीण दारिद्र्यात गेले हे आपण त्या दुधाच्या प्रसंगावरून निश्चित सांगू शकतो. मात्र गुरू द्रोणाचार्य यांनी आपले शिष्य कौरव आणि पांडवांकडून ‛पांचाल’ राज्य जिंकून घेतले आणि अश्वत्थामाचे तरुणपण काही काळ राजवैभवात गेले असे म्हणता येईल. पण राजवैभव रास न आल्याने अश्वत्थामाने राजाअसूनही राज्याबाहेर कुटी करून राहणे पसंत केले.
कुरुक्षेत्राच्या युद्धात काय काय नाही झाले हे आपणांस ठाऊकच आहे. या युध्याच्या परिणामी अश्वत्थामाची क्रूरता, निर्दयता ठामपणे दिसून येते. आधीच दुष्कर्मी दुर्योधनाशी संगत त्यात दुष्टपणा, क्रूरता हे अवगुण ठळक झाले. युध्याच्या शेवटी पांडवपुत्रांची छळाने हत्या तसेच अभिमन्यूची पत्नी उत्तराच्या गर्भातील भ्रूणावर दिव्यास्त्र चालविणे हे निर्दयतेचे एक मोठे उदाहरण आहे. हे करण्यामागे “आपल्या वडिलांचा पांडवांनी छळाने केलेली वध” यातुन सुडाची भावना हे ही एक कारण होते.
           दुष्कृत्याचे फळ म्हणून श्रीकृष्ण अश्वत्थामाचा मणी काढून घेतात व पिडामय दिर्घायुष्याचा श्राप देतात. श्रीमुखातून निघालेला शब्द नि शब्द खरा होऊ लागतो आणि अश्वत्थामा ती असह्य पीडासहित जंगलांमध्ये भटकतो. असे म्हटले जाते की अश्वत्थामा कलीकालाच्या चार लाख बत्तीस हजार वर्ष तपस्या केल्यानंतर श्रापमुक्त होईल. शिव महापुराण (शतरुद्रसंहिता-३७) नुसार अश्वत्थामा आजही जिवंत आहे. अश्वत्थामा महाभारत काळापासून सातपुडांचलमध्ये निवास करतात असे स्थानिकांचे मत आहे.
           अश्वत्थामा या शब्दाचा अपभ्रंश होऊन अस्तंबा, अस्टंबा, तांबा ऋषी असे झालेले दिसते. अश्वत्थामांना सातपुड्यातील आदिवासी पूज्य मानतात याचे एक कारण म्हणजे अश्वत्थामा शिवांश आहे. भगवान शिव हे आदिवासींचे पूज्य दैवत आहेत आणि या कारणाने अश्वत्थामाला ‘शिवाचा अवतार’ या रूपाने पूजिले जाते.
दुसरे कारण असे की, श्राप मिळाल्यानंतर अश्वत्थामा ब्रह्मचर्याचे पालन करीत जप-तप करून ऋषीपदापर्यंत गेल्याने अश्वत्थामा ऋषी व महाराज हे संबोधन मिळून त्यांना पूजिले जाते.

अस्तंबा यात्रा -
           अस्तंबा यात्रा ही मुख्यतः धनत्रयोदशीपासून सुरू होते. लाखोंच्या संख्येने भाविक या यात्रेची वाट धरतात. ही यात्रा अश्वत्थामासाठी नसून, तपस्वी अस्तंबाच्या दर्शनासाठी असावी. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांच्या सीमापरिघातील आदिवासी भाविक या यात्रेची आतुरतेने वाट बघतात. या यात्रेचे केंद्र असते ते “श्री अस्तंबा ऋषी महाराज धाम” हे शिखर. समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीचे हे शिखर आहे. या शिखराच्या पायथ्याशी आहे अस्तंबा गाव, ता.धडगाव (अक्राणी), जि. नंदुरबार, महाराष्ट्र. अस्तंबा गावाला जुना अस्तंबा म्हणूनही ओळखले जाते कारण अस्तंबा ऋषीं पूर्वी या शिखराच्या पायथ्याशीच वास करत असत मात्र येथे जनसमुदाय वसाहती वाढल्यामुळे ते शिखरावर तप करण्यासाठी गेले. असे म्हटले जाते की श्रापानंतर अश्वत्थामा पश्चताप करीत या सातपुड्यात जप-तप करत वास करतात. अस्तंबा ऋषी हे कृष्णभक्तीत रममाण होऊन श्रीमदभगवद्गीतेच्या उपदेशानुरूप आपले जीवन जगतात. 
यात्रेचे काही कडक नियम असतात त्यांना आदिवासी भाषेत “पालनी” असे म्हणतात. अश्वत्थामाने ब्रम्हचर्य धारण केल्याने येथे दर्शन घ्यायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ब्रम्हचर्याचे पालन करणे अनिवार्य असते. साधारणतः एक किंवा सव्वा महिना या पालनीचा कालावधी असतो. काही भाविक सहा महिने किंवा एक वर्षापर्यंतही पालनी करतात.

पालनीचे स्वरूप -

           पालनी करणाऱ्या व्यक्तीने मुख्य म्हणजे ब्रम्हचर्य पालन करणे बंधनकारक असते. त्यासाठी घरापासून/गावापासून लांब राहणे यामुळे जे भाविक यात्रा करणार आहेत ते गावाबाहेर शेतमळ्यात वास्तव्य करतात. स्त्री स्पर्शाचे अन्न ग्रहण न करण्याचा नियमामुळे स्वतः चुल्ह्यावर अन्न तयार करून खाणे, पलंग, खाट-खुर्चीचा त्याग करणे,(अभिमानवृत्ती नष्ट व्हावी या कारणास्तव.) तसेच केस न कापणे, कोणत्याही प्रकारचे व्यसन न करणे, सत्य बोलणे तसेच रोज भजन कीर्तन करणे. डफ वाजविण्याची तालीम ही यात समाविष्ट असते. अश्याप्रकारे पालनीचे नियम असतात.
अशी मान्यता आहे की जो व्यक्ती की कठोर पालनी पूर्ण करून, यात्रा करतो त्याला यात्रेत कुठलाच त्रास होत नाही आणि तो सहजरित्या ही यात्रा पूर्ण करतो. 
पालनी करणाऱ्या व्यक्तीबरोबरच त्या व्यक्तींच्या कुटुंबजनांना ही सतर्क राहणे महत्वाचे असते. कुटुंबातील ती व्यक्ती यात्रा पूर्ण करून घरी परतेपर्यंत कुटुंबजनांनी काही अपराध केला तर त्याचा त्रास त्या व्यक्तीला यात्रेदरम्यान होतो.
पालनी करण्यामागे एक चांगले व्यक्तित्व निर्माण व्हावे आणि यातून व्यक्तिमत्त्वासह सामाजिक विकास ही होईल हे ध्येय असावे.


● अस्तंबा लोककथेतून -


भीमकुंडाची निर्मिती :-

           कुरुक्षेत्र युद्धानंतर अश्वत्थामाने जेव्हा पांडव पुत्रांची हत्या तसेच उत्तरेच्या गर्भातील भ्रूणावर दिव्यास्त्र चालवून पलायन केले तेव्हा भीम तसेच अर्जुन आणि कृष्ण त्याच्या मागे लागले. अश्वत्थामा सातपुड्याच्या या सर्वोच्च शिखरावर चढले त्यांचा पाठलाग करणारे भीम यांनी तहान शमविण्यासाठी ज्या ठिकाणी गदा मारून कुंड निर्माण केले त्या कुंडाला आज भीमकुंड म्हणून ओळखले जाते.

डाकिण दोगडो (डाकिणीचा दगड) :-

           अशी आख्यायिका आहे की, एकदा एक स्त्री अस्तंबा शिखर चढण्याचा प्रयत्न करीत होती. काहींच्या मते ही स्त्री जादूटोणा करणारी डाकिण होती असे म्हटले जाते. पण अस्तंबा ऋषींच्या ब्रम्हचर्याच्या शक्तीने ती स्त्री घसरून पडली त्या दरम्यान तिचे दगडात रूपांतर झाले. तेव्हा पासून त्या दगडाला डाकिण दोगडो असे म्हटले जाते.

यात्रेची सुरवात :-

          सातपुड्यातील अश्वत्थामा यात्रेचा इतिहास ठळकपणे मिळत नाही आणि म्हणूनच लोककथांवर अधिक भर जातो.
अश्वत्थामांनी वेश बदलून तळोदा तालुक्यातील वारली या गावी शेतरखवाल तसेच गुराखी म्हणून एक वर्ष वास केला. मृत बकरीच्या चर्मपासून डफ बनवून तो कसा वाजवावा. तसेच पालनी कशी करावी हे त्यांनी गावातील पुरुषांना शिकविले आणि तेव्हापासून या यात्रेला सुरवात झाली.

अस्तंबा ऋषींच्या पादुका व मूर्ती :-

           अस्तंबा ऋषींच्या चरणपादुका या बेज (जि. तापी, गुजरात) गावातील सोनजी बाबा यांच्याकडे होत्या. आजही सोनजी बाबांचे वंशज त्या पादुकांना पूजतात.
अस्तंबा ग्रामस्थ सांगतात की आमच्या देवाची चोरी झाली होती. मात्र जेव्हा सोनजी बाबा अस्तंबा ऋषींच्या पादुका घेऊन जात होते तेव्हा अस्तंबा ऋषींची मूर्तीही त्यांच्यासोबत येत होती. नंतर जेव्हा अस्तंबातील ग्रामस्थांनी बेज या गावी येऊन सोनजी बाबांना सांगितले की, “आमच्या देवाची मूर्ती आम्हांला परत करा.” तेव्हा सोनजी बाबा म्हणाले, “ठीक आहे. आपण मूर्ती घेऊन जाऊ शकतात.” मात्र जेव्हा त्या ग्रामस्थांनी मूर्ती उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मूर्ती उचलली गेली नाही. आजही बेज या गावी अस्तंबा ऋषींचे मंदिर असून मूर्तीही स्थापित आहे.

संदर्भ :-
०१) महाभारत
०२) अश्वत्थामा - नितीन पाडवी

© हर्षद उ. वि. वळवी

 हे देखील वाचा :
 अस्तंबा यात्रा : एक अविस्मरणीय अनुभव

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट